Wednesday, September 30, 2009

वॉक थ्रू हॉस्पिटल

या वर्षीच्या जुलै महिन्यात स्वाइन फ्ल्यूचे भारतात आगमन झाले व ऑगस्टपर्यंत त्याने चांगलाच धुमाकूळ घालण्यास सुरवात केली होती. या फ्ल्यूचा सर्वात मोठा दणका पुण्याच्या लोकांना सहन करावा लागला. सुरवातीच्या काळात रोगाच्या साथीपेक्षा, रोगाची भिती आणि दहशत यांचाच लोकांना जास्त त्रास झाला. म्युन्सिपल कॉर्पोरेशनची एक किंवा दोनच तपासणी केन्द्रे होती. या ठिकाणी आजारी व भीतीग्रस्त नागरिकांना, पावसात लांबच लांब रांगा लावून उभे रहाण्याची वेळ आली. नंतर जास्त तपासणी केन्द्रे स्थापित करण्यात आली. लोकांना क्यू लावून उभे रहाण्याची गरज उरली नाही. पण पहिल्या दोन तीन दिवसात, आजारी पुणेकरांचे हाल झाले हे मात्र खरे.

हा रोग सुरू झाला मेक्सिकोत फेब्रुवारी मार्च मधे व नंतर हा रोग, अमेरिकेतली त्या ऋतुतली हवा थंड असल्याने, लगेच पसरला. अमेरिकेत खूप मोठ्या प्रमाणात लागण झाली. 1 ऑगस्ट पर्यंत या रोगाने अमेरिकेतील 46 बालकांचा बळी घेतला आहे. नंतर हवा गरम झाल्याने स्वाइन फ्ल्यूने हातपाय आवरते घेतले. आता शरद ऋतु चालू झाल्यावर हवा परत थंड होऊ लागली आहे व रोगाने पुन्हा मोठ्या प्रमाणात डोके वर काढायला सुरवात केली आहे.

टेनेसी राज्यातल्या मेम्फिस शहरातील ‘ल बॉनहर’ हॉस्पिटलमधे 1 ऑगस्टपासून साडेपाच हजार मुले फ्ल्यूची लक्षणे दिसल्यामुळे हॉस्पिटलकडे आली आहेत. टेक्सास राज्याची राजधानी असलेल्या ऑस्टिन मधे मागच्या रविवारी ‘डेल मेडिकल सेंट’र या हॉस्पिटलमधे आप्तकालीन वैद्यकीय सेवा घेण्यासाठी 400 मुले आली. यातली बहुतेक फ्ल्यूच्या लक्षणांनीच पछाडलेली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आजारी मुले येत असल्याने हॉस्पिटल्समधल्या सध्याच्या उपचार केन्द्रांना त्यांच्यावर उपचार करणे कठिण बनत चालले आहे.

अमेरिकेत आणि इतर प्रगत देशात, वॉक थ्रू किंवा ड्राइव्ह थ्रू प्रकारची रेस्टॉरंट्स सगळीकडे असतात. त्याचप्रमाणे एटीएम मशीन बसवलेल्या बॅन्क्स आणि औषधे देणार्‍या फार्मसीज पण असतात. या कल्पनेचा वापर करून या दोन्ही हॉस्पिटल्सनी, ‘वॉक थ्रू’ वैद्यकीय सेवा केन्द्रे चालू केली आहेत. ही सेवा केन्द्रे म्हणजे ओळीने उभारलेले तीन तंबू आहेत. या तंबूंच्यात स्वाइन फ्ल्य़ू साठी सर्व तपासण्या करता येतील अशा सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. सर्व सर्दी, खोकला किंवा ताप आलेले रुग्ण या तंबूसमोर गाडी पार्क करतात. बर्‍याच वेळा ते शर्ट पायजमा याच वेशात असतात. तंबूंच्या मधून ते चालत जातात. येथे ताप बघण्यापासून सर्व तपासण्या केल्या जातात. ज्या मुलांना स्वाईन फ्ल्यू झाल्याची शंका असते त्यांना टॅमीफ्ल्यू हे फ्ल्यूवरचे औषध शेवटी देण्यात येते, बाकीच्या मुलांना साधी औषधे देउन लगेच घरी पाठवून दिले जाते. मेम्फिस मधल्या हॉस्पिटलमधे, या ‘वॉक थ्रू’ सेवेचा लाभ, 11 सप्टेंबर नंतर 900 मुलांनी घेतला आहे.

फ्ल्यूचे रोगी या निराळ्या केन्द्रावर पाठवल्याने, मुख्य आपत्कालीन सेवा केन्द्र, हृद्रोग, अपघात सारख्या कारणानी येणारे रुग्ण तपासण्यासाठी मोकळे झाले आहेत. 3 वर्षांच्या मुलांपासून संपूर्ण कुटुंबे फ्ल्यूसाठी तपासणी करण्यासाठी या वॉक थ्रू केन्द्राच्यावर येऊ लागली आहेत.

भारतातल्या म्युन्सिपल कॉर्पोरेशन्सनी या धर्तीवर उपचार केन्दे चालू केली तर पुण्याच्या नागरिकांचे जुलै महिन्यात जे हाल झाले ते भविष्यात तरी नक्कीच टाळता येतील असे वाटते.

30 सप्टेंबर 2009

No comments:

Post a Comment